SHARE
Press Conference By Judges (Supreme Court)- GenXSentinel
Press Conference By Judges (Supreme Court)- GenXSentinel

एकाच वा विविध न्यायालयातील न्यायमुर्तींची मते सारखीच असतील असे नाही. त्यांच्यात प्रत्येक बाबतीत एकमत होईलच असे नाही. पण मतभेद असले तरी त्याची जाहिर वाच्यता होत नसते. त्यातही सुप्रिम कोर्ट म्हणजे देशातील कायद्याचा अंतिम शब्द मानला असल्याने, तिथल्या न्यायमुर्तींचे मतभेद यापुर्वी कधी असले तरी समोर आलेले नव्हते.

इंदिराजींच्या काळात ज्येष्ठता डावलून सरन्यायाधीशांची नेमणूक झाली, तेव्हा नाराजी व्यक्त करण्यासाठी तिघा ज्येष्ठ न्यायमुर्तींनी राजिनामे टाकले होते. पण ज्यांची त्या पदावर नेमणूक झाली त्यांच्यावर कुठलेही आरोप वा आक्षेप घेतलेले नव्हते. यावेळी तीच लक्ष्मणरेषा ओलांडली गेलेली आहे.

चार ज्येष्ठ न्यायमुर्तींनी अकस्मात शुक्रवारी पत्रकारांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. आपल्या मनातील नाराजी जाहिरपणे व्यक्त केली आणि थेट सरन्यायाधीशांच्या विरोधात जनतेच्याच कोर्टात दाद मागितली. हा सगळा प्रकारच इतका चकीत करणारा होता, की त्यावर कशी प्रतिक्रीया द्यावी याविषयी सगळ्यांचा गोंधळ उडाला होता. पण विनाविलंब तो गोंधळ दुर व्हायला सुरूवात झाली. यात कोण कोणाच्या बाजूला येऊन उभा रहातो आहे, त्यानुसार मग सोशल मीडियातही विभागणी होत गेली. ही विभागणी म्हणजेच झुंडीची मानसिकता असते. तिथे विचार विवेकाला थारा नसतो. आपण ज्या कळपातले त्याच्यासाठी आत्मसमर्पणाला पुढे यायचे असते. त्याचीच शुक्रवारी प्रचिती आली.

कळपातले वा झुंडीतले प्राणी जसे एकजिनसी वागतात वा आवाज काढतात, तशी स्थिती काही तासाभरातच निर्माण होत गेली. ती कशी झाली याचा शोध घेत गेल्यास, झुंडी कशा वागतात व प्रतिसाद देतात ते समजू शकते.

वास्तविक हा विषय सुप्रिम कोर्टातील वरीष्ठ न्यायमुर्तींच्यात सुरू झालेल्या बेबनावाचा होता. विद्यमान मुख्य न्यायमुर्ती दीपक मिश्रा व त्यांच्याच इतके ज्येष्ठ व अनुभवी असलेल्या चार न्यायमुर्तींच्यात विविध विषयावर जे मतभेद होते. ते दूर झाले नाहीत म्हणून लक्ष्मणरेषा ओलांडून चार ज्येष्ठांनी जाहिरपणे आपली तक्रार मांडलेली होती. त्याचा संबंध दोन महिने जुन्या प्रकरणाशी होता. त्यात सरन्यायाधीशांनी मनमानी केल्यामुळे हे चौघे ज्येष्ठ नाराज होते आणि तेव्हाच त्यांनी पत्र लिहून आपली नाराजी कळवलेली होती. पण त्यानुसार सरन्यायाधीशांच्या वर्तनात व कामकाजात बदल झाला नाही, म्हणून हे चौघे जाहिर मतप्रदर्शनाला पुढे आलेले होते.

ज्या दिवशी ते समोर आले त्याच दिवशी आणखी एका प्रकरणाशी सुनावणी व्हायची होती आणि देशातल्या पुरोगामी म्हणवून घेणार्‍या जमातीचा जीव त्या प्रकरणात गुंतलेला होता. सहाजिकच नाराजीचे नाते या ताज्या प्रकरणाशी जोडण्यात उतावळेपणा झाला. जी तक्रार त्या चौघांनी माध्यमांच्या समोर येऊन केली, तोच आक्षेप सविस्तर तपशील देऊन दुष्यंत दवे नावाच्या ज्येष्ठ वकिलांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ या दैनिकात एका लेखातून मांडला होता. सहाजिकच बहुतांश पुरोगाम्यांचे लक्ष ताज्या प्रकरणाकडे लागलेले होते. त्यातही दवे यांचा अपरोक्ष सहभाग होताच.

तर अशा विखुरलेल्या तमाम पुरोगामी लोकांचे एकाच वेळी लक्ष त्या ताज्या, म्हणजे न्या लोया. यांच्या संशयास्पद मृत्यू तपास याचिकेकडे लागलेले होते. पण ते बाजूला पडून सुप्रिम कोर्टातून पहिली बातमी आली, ती चार नाराजांच्या पत्रकार परिषदेची. त्यात माहिती देण्यापेक्षा नुसताच धुरळा उडवला गेलेला होता. मग कोणी काय अर्थ घ्यावा?

या पत्रकार परिषदेत चौघा न्यायमुर्तींच्या सोबतच उदारमतवादी पुरोगामी म्हणून गणले जाणारे ज्येष्ठ संपादक शेखर गुप्ता कॅमेरात आले. ते न्यायाधीशांच्या मागेच उभे राहून कुजबुजत होते.

 

न्यायमुर्तींचे निवेदन संपल्यावर नाराजीचे कारण विचारण्याचा अनेक पत्रकारांनी प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. “आपले दोन महिने जुने पत्रच देतो”, असे सांगून चौघेजण अधिक बोलत नव्हते. त्यातच कुणा पत्रकाराने या नाराजीचा लोया मृत्यूशी संबंध आहे काय, असा प्रश्न केला आणि त्यावर न्या. रंजन गोगोई यांनी होकारार्थी उत्तर दिले. पण एकाचवेळी चारपाच प्रश्न विचारले गेल्याने त्यांनी नेमके कशाला होकारार्थी उत्तर दिले, हे गुलदस्त्यात आहे. पण तेवढेच ऐकण्यासाठी कानात प्राण आणून बसलेल्या देशभरच्या पुरोगाम्यांचा जीव भांड्यात पडला.

तात्काळ मग लोया मृत्यूच्या प्रकरणाला दाबण्यावरूनच सुप्रिम कोर्टातही मतभेद निर्माण झाल्याचा कांगावा सुरू झाला. देशाच्या कानाकोपर्‍यातून पुरोगामी म्हणून विखुरलेली जमात एकसुरात समान प्रतिक्रीया देऊ लागली. ट्वीटर व सोशल मीडियातून तशा प्रतिक्रीया उमटू लागेपर्यंत, तथाकथित मोदीभक्त वा भाजपाचे समर्थक गोंधळलेले होते. त्यांना या घटनाक्रमाचा थांग लागलेला नव्हता. सरन्यायाधीश योग्य की त्यांच्या विरोधातली नाराजी योग्य, त्याचा मोदी समर्थकांना अंदाजही येत नव्हता. पण राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, राणा अयुब वा तत्सम मोदीत्रस्त मंडळींनी या चौघा न्यायाधीशांशी तळी उचलून धरली म्हटल्यावर, मोदी समर्थकांना योग्य दिशा मिळाली.

“ज्याअर्थी ही मंडळी कंबर कसून चौघा न्यायाधीशांचे समर्थन करायला मैदानात आली, त्याअर्थी चौघे न्यायाधीश मोदी विरोधकच असल्याचा” या दुसर्‍या कळपाला साक्षात्कार झाला. त्यानंतर सोशल मीडियात या दोन्ही कळपामध्ये तुंबळ युद्ध छेडले गेले. त्यातल्या कोणालाही वास्तव किंवा सत्याचा शोध घेण्याची अजिबात गरज भासली नाही.

दोन्ही बाजूंना चौघे न्यायमुर्ती कशाविषयी तक्रार करत आहेत, त्याच्याशी काहीही कर्तव्य नव्हते. प्रत्येकजण आपापल्या कळपाच्या भूमिकात गेलेले होते. त्यामुळेच एका कळपाने सरन्यायाधीशांना लक्ष्य केले आणि त्याची प्रतिक्रीया म्हणून दुसर्‍या कळपाने त्या चौघा न्यायाधीशांना लक्ष्य करण्यास आरंभ केला. त्यात सरन्यायाधीश मनमानी करतात किंवा पुर्वीचे संकेत पाळले जात नाहीत, हा गंभीर मुद्दा कुठल्या कुठे फ़ेकला गेला.

यातून एक गोष्ट लक्षात येते, की कितीही आधुनिक युगात आपण आलेले असलो तरी स्वत:ला सुबुद्ध म्हणवणार्‍या समाजाची मानसिकता अजूनही कळपाची राहिलेली आहे.

ही कळपाची मानसिकता सुचनाप्रवण असते. सामान्य पशू ठराविक शब्द वा आवाजाने प्रवृत्त होतात आणि तशी कृती करतात. त्यापेक्षा याही बाबतीत काही वेगळे घडलेले नाही. असे अनेक प्रसंग दाखवता येतील. त्यामध्ये काय योग्य वा अयोग्य, याच्याशी भांडणार्‍याला काही कर्तव्य नसते. मेंढरांच्या कळपात जसे पुढल्याच्या मागे धावत सुटले जाते, तसाच काहीसा प्रकार इथेही घडताना आपण बघू शकतो.

या न्यायाधीशांच्या नाराजी व्यक्त करण्यासाठी इतके मोठे पाऊल उचलण्याची कृती केवळ एका लोया नामक प्रकरणाशी निगडित असू शकत नाही. अशा शेकडो प्रकरणांची आजवर उलथापालथ झालेली आहे आणि त्यावरून खडाजंगी उडालेली आहे. इंदिराजींच्या काळात ज्येष्ठताक्रम डावलून सरन्यायाधीशांची नेमणूक झाली, तेव्हा तिघा ज्येष्ठांनी आपल्या पदाचे राजिनामे दिलेले होते. पण पदावर कायम राहून नाराजी पत्रकार परिषदेत सांगण्याचे पाऊल उचलले नव्हते.

खरेतर तेव्हा तो विषय थेट न्यायपालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा म्हणून अधिक गंभीर होता. शिवाय तेव्हा सरकारशी निष्ठावान बांधिलकी मानणारी न्यायव्यवस्था, अशी खुलेआम एकाधिकारशाहीची भाषा वापरली जात होती. पण कोणी पत्रकार परिषद घेतली नव्हती.

मुद्दा असा, की यावेळी हे चार न्यायाधीश लक्ष्मणरेषा ओलांडून बाहेर आले, त्यामागे काही मोठा आक्षेप असू शकतो. त्यातले तिघे लौकरच निवृत्त होणार असले तरीही त्यापैकी एक रंजन गोगोई हे पुढले सरन्यायाधीश मानले जातात. त्यांच्या नेमणूकीवर गदा येण्याचा धोका पत्करून त्यांनीही आपल्या अन्य तिघा ज्येष्ठ सहकार्‍यांना साथ दिली. ती एका ठराविक प्रकरणाच्या सुनावणीचे खंडपीठ ठरवण्याविषयी असू शकत नाही.

दिर्घकाळ अशा रितीने संकेत व प्रथा मोडल्या गेल्या आहेत आणि त्याची जाहिर वाच्यता यापुर्वीही दबल्या आवाजात होत राहिली आहे. पण न्यायालयाचा अवमान ही टांगली तलवार समोर असल्याने, कोणी त्याविषयी जाहिर बोलायची हिंमत करत नव्हता. त्यालाच या चौघांनी वाचा फोडलेली आहे. पण त्याला बगल देऊन काही लोकांनी त्याला राजकीय रंग चढवण्याचा प्रयत्न केला. त्याचा आपल्या राजकीय हेतूंसाठी उपयोग करण्याचा डाव खेळलेला आहे. पण त्याचा शोध घेण्याचा विचार झाला नाही, किंवा प्रकरणातील गुंतागुंत समजून घेण्याची कोणाला गरज वाटली नाही.

ही आजच्या सुबुद्ध वर्गाची खरेतर शोकांतिका आहे.

मोदीभक्त म्हणून हिणवला जाणारा वर्ग असो किंवा मोदीत्रस्त म्हणून आंधळेपणाने मोदी विरोधात कंबर कसून कायम सज्ज असलेला वर्ग असो, दोघांनी आपापल्या कळपाला सुलभ ठरेल असा पवित्रा विनाविलंब घेतला. तो आधी कोणी घेतला आणि कोणी नंतर प्रतिसाद दिला, याचा वाद घालण्याची गरज नाही. एकूण राजकीय व सामाजिक मानसिकता कशी कळपात विभागली गेली आहे, त्याची साक्ष यातून मिळाली.

याला सुचनाप्रवणता म्हणता येईल.

सुचनाप्रवणता म्हणजे शब्द, प्रतिके, खुणा वा इशारे देऊन अख्खे कळप इकडचे तिकडे फ़िरवले जातात. त्यांच्यात रक्तलांच्छित रणकंदन माजवता येत असते. ते शब्द वा प्रतिकांसाठी बाकीचा कसलाही विचार न करता परस्परांवर तुटून पडत असतात.

हे कसे होऊ शकते? मानवी मनाचे दोन भाग असतात. त्यातला एक भाग मेंदूच्या अनुभवाने कार्यरत होत असतो. तो बोधामुळे कार्यरत होत असतो. मेंदूचा दुसरा भाग अबोध मनाचा असतो. त्यात जुने संचित अनुभव जमा झालेले असतात. त्याक्षणी त्याला अनुभवाची गरज नसते.

आपल्या रहात्या घरी वा वस्तीत अकस्मात दिवे गेले तर गुडूप अंधार होतो. अशावेळी आपण अगदीच अनोळखी भागात असू तर पुढे पाऊल टाकण्याची आपल्याला हिंमत होत नाही. पण नेहमीचा रस्ता, जिना किंवा परिसर असेल, तर त्या गडद अंधारातही आपण हळुहळू वाट काढू लागतो. चाचपडत संथ गतीने चालतो, जिना चढतो किंवा या खोलीतून दुसर्‍या खोलीत वगैरे जातच असतो. मनात शंका असली तरी हे आपण करू शकतो. कारण आपल्याला रस्ता, जिना दिसायची गरज नसते. नेहमीचे असल्याने त्या भागाच्या स्मृती आपल्या मेंदूत साचलेल्या असतात आणि त्यांचाच आधार घेऊन आपण वाट काढत असतो.

अबोध मन हे तसेच काम करत असते. मनात दिर्घकाळ साचलेल्या स्मृतींच्या अनुभवाने आपण वाटचाल करीत असतो. अनाकलनीय गोष्ट उघड्या डोळ्यांनी बघितली वा अनुभवली, तर त्याचा उलगडा होत नाही. तेव्हा आपण आपल्या स्मृतीत असलेल्या अनुभवाच्या आधारे त्याचे विश्लेषण करून निर्णय घेतो वा कृती करतो.

हजारो पिढ्यांपासून साप हा दंश करणारा प्राणी असल्याचे आपल्या मनात इतके बिंबलेले आहे, की सर्पमित्रांनी कितीही पटवून दिले, तरी समोर साप दिसला, मग तो विषारी नसला तरी त्याला मारायला आपले हात शिवशिवत असतात. कळपाची मनोवृत्ती नेमकी अशीच काम करत असते.

एका क्षणात आपण कुठल्या तरी कळपाचे असल्याची जाणिव आपल्याला इकडे किंवा तिकडे जमा करीत असते. न्यायाधीशांच्या वादंगातून आपण ज्या विभागलेल्या प्रतिक्रीया बघितल्या, त्याला तीच सुचनाप्रवणता कारणीभूत आहे.

 

जेव्हा बोध मनाला म्हणजे ज्ञानेंद्रियांना आलेल्या अनुभवातून काही निर्णय करता येत नसतो, तेव्हा अबोध मनात साचलेल्या स्मृतींकडे आपण वळत असतो. आजवर अशा स्थितीत कोण दगाबाज होता? कोणाचे वक्तव्य अशा स्थितीत कसे असते? कोण कुठल्या कळपातला आहे? तो आज कुठल्या बाजूला उभा आहे? त्यानुसार मग आपली कृती करण्याचा निर्णय परस्पर घेतला जात असतो.

त्या न्यायाधीशांनी आपल्या कारणासाठी लक्ष्मणरेषा ओलांडून जाहिरपणे नाराजी व्यक्त केली. पण त्यांच्या सोबत शेखर गुप्ता होता किंवा नंतर त्यांना भेटायला कम्युनिस्ट नेता डी. राजा पोहोचले. त्यापैकी एका न्यायाधीशाने लोया प्रकरणाला होकार दिला. अल्पावधीतच त्यांचे समर्थन करायला पुरोगामी कळप पुढे सरसावला. त्यांना घटनेमागचे सत्य बघायची गरज वाटली नाही. जुन्या स्मृतीतल्या अनुभवातून त्यांनी शरसंघान सुरू केले आणि त्यांचे चेहरे समोर येताच, भाजपा वा मोदी समर्थकांनाही सत्याचा बोध घेण्याचे कारण उरले नाही.

ठराविक लोक जी बाजू घेतात, त्यांच्या विरोधात आपण असल्यामुळे विषय कुठला का असेना, आपण दंड थोपटून विरोधातच बोलायला वागायला हवे, अशी अतीव इच्छा या कळपात पसरली. त्यांना कोणी सुचना देण्याचे कारण नव्हते. समोरून मिळणारे संकेत व इशारे त्यासाठी पुरेसे असतात. ते संकेत, त्या प्रतिमा वा त्यातले शब्द ठराविक सूचना देत असतात आणि त्यातून मनात साचलेल्या जुन्या अनुभवानुसार माणूस वागू लागतो. त्याचे कळपातल्या एका पशूमध्ये रुपांतर होत असते. अशी मने संकेत व सुचनांची प्रतिक्षाच करीत असतात. जसजशा सूचना त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचतात, तसे ते कार्यप्रवृत्त होत असतात. कधी आक्रमक होतील, कधी भावनाविवश होतील, कधी सहानुभूतीने विरघळून जातील कधी श्वापदाला सुद्धा लाजवील अशा थराला जातील. तेव्हा त्यातला कोणी किती सुशिक्षित वा सुविद्य आहे, त्याचे मोजमाप करण्यात काही अर्थ नसतो.

तो कळपाचा एक भाग असतो.

ती झुंड असते आणि झुंडीच्या मानसिकतेनुसार काम करीत असते.

LEAVE A REPLY