SHARE
Gold Cost 2018-GenXSentinel
Gold Cost 2018-GenXSentinel

गोल्ड कोस्ट

हिंदुस्थानच्या वेटलिफ्टर्संनी धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर आता नेमबाजांनीही शूटिंग रेंजवर अचूक निशाणा लावला आहे. हिंदुस्थानच्या नेमबाजांनी बुधवारी देशाला तीन पदके मिळवून दिली. श्रेयसी सिंगने महिलांच्या डबल ट्रपमध्ये सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली, तर ओम् मिथरवालने ५० मीटर पिस्तोलमध्ये कास्य पदकावर नाव कोरले. त्याचे हे या स्पर्धेतील दुसरे पदक ठरले हे विशेष. पुरुषांच्या डबल ट्रपमध्ये अंकुर मित्तलने कास्य पदकाला गवसणी घातली.

श्रेयसी सिंगने ९६ अधिक दोन गुणांसह गोल्ड मेडल जिंकले. ऑस्ट्रेलियाच्या इमा कॉक्सला ९६ अधिक एक गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. स्कॉटलंडच्या लिंडा पीअरसनने ८७ गुणांसह कास्य पदक आपल्या नावे केले. या प्रकारात हिंदुस्थानच्या वर्षा वर्मनचे कास्य पदक थोडक्यासाठी हुकले. तिने ८६ गुणांची कमाई करत चौथा क्रमांक पटकावला.

पुरुषांच्या ५० मीटर पिस्तोल प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल रेपाचोलीने २२७.२ गुणांनिशी गोल्ड मेडलवर हक्क सांगितला. बांगलादेशच्या शकील अहमदने २२०.५ गुणांनिशी रौप्य पदक पटकावले. तसेच हिंदुस्थानच्या ओम मिथरवाल याने २०१.१ गुणांनिशी तिसऱया स्थानावर मुसंडी मारली. पुरुषांच्या डबल ट्रपमध्ये स्कॉटलंडच्या डेव्हिड मॅकमेथने ७४ गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. आयोएमच्या टीम नीलने ७० गुणांसह दुसरा आणि हिंदुस्थानच्या अंकुर मित्तलने ५३ गुणांनिशी तिसरा क्रमांक पटकावला.

LEAVE A REPLY